घुसखोर
January 2017
कुठेपण. हो. पितळखोऱ्याच्या ठिसुळ भासनाऱ्या कड़क भेगाळ खड़काळ कड़ेकपारीच्या काळोखातल्या अशाच फाफट शब्द्जंजाळ रेघोट्यांपासून समुद्राच्या खारट नागड्या मनमोकळ्या लाटांच्या भसाड्या तालात गुणगुणत गुंतलेल्या कवितेपर्यंत. कुठेपण घुसघुसून घोरपडी लपंडाव चिवटपणे खेळायचा. काही दिडशहाणी मंडळी जेव्हा जाम कंटाळा येऊ नये म्हणून स्वत:शीच जसा बुद्धिबळाचा डाव रचतात ना, आणि दोन्ही बाजू प्रामाणिकपणे खेळण्याचा महत्तम आव आणून स्वत:च्या खिलाडूवृत्तिवर स्वत:च संतुष्ट होऊ पाहतात, तसलाच हा प्रकार. घुस कुठेतरी आणि मग थोडा आजुबाजूला चाचपडत शोधल्यासारखं कर. हार-जीत दोन्ही आपल्याच बापाच्या खिशात न हो. किती भारी. जेव्हा जसा मूड, तेव्हा तसा धिंगाना. गाजर अणि पुंगी, डब्बल धंदा. घुसखोर फॉर द विन.
घुसखोर तूझ्या माझ्यासारखाच इथे आला. हो, इथे. येताना तो सगळ्यांसारखाच डुलतडूलत येतो. आल्यावर मग खेळ चालू करावा लागतो त्याला, डोक्यापाण्यासाठी. तो तो बघ, ह्या अक्षरांच्या सावलीत बुडून बसलाय. नाही, असं थेट बघू नये. इकडे तिकडे उडत उडत नजर सहज फेक. धूर्त. तो इथे लपलाय हे आपल्याला कळलं हे त्याला कळलं तर आपण त्याला खबर देऊ तो कुठे लपला आहे असा त्याला संशय येईल आणि मग तो इथून गुपचुप कल्टी मारेल, अणि आपणच कसे खोटे वा चुक ते दाखवून देईल फिरून येऊन. घुसने हा फ़क्त त्याचाच जन्मसिद्ध हक्क. शहाणे असूत, तर त्याच्या खेळातही आपण घूसखोरी करू नये. लाईक फ्लाय ऑन द वॉल. तू अणि मी. इकडे त्याच्या पाठीमागे बोलायच्या चावट गोष्टी त्याचा समोर उगाच इथे खुसपूसत बसण्याचा स्टंट करुत इकडे तिकडे उगाच माना डोलवत सामान्यपणाचा आव आणून, मधून अधून डोकावत. चहा पण पित राहूत, हातातला.
ती लोखंडी साखळदंडातल्या परीस शोधनाऱ्याची गोष्ट आठवते तुला? जंगलातला प्रत्येक दगड तपासून पाहत होता तो स्वत:च्या साखळदंडाला लावून. त्या सोन्याच्या कधी होउन गेल्या त्याच्या कधी लक्षातही आले नाही. स्वत:ला सापडून हरवत बसणे हा घुसखोऱ्याचा आवडीचा खेळ झालाय, आणि त्याची ती संपूर्ण सर्कस फटीफटीतुन चोरून पाहून त्यावर विद्रूप सजलेल्या फेसबुक पोष्टा फेकने हा आपला.